पिंपरी : उत्तरप्रदेशातून थेट विमानाने पुण्याला यायचे, पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये रहायचे. मात्र, पुणे मुक्कामी असाताना घरफोड्या करायच्या, अशा शाही थाटात चोऱ्या करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मिश्री राजमर (वय ३६, रा. बोदरी, जि. जोनपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
२२ जुलै रोजी माऊली रेसिडेन्सी येथे एका फ्लॅटमध्ये चोरी झाली. चोरट्याने नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर २५ जुलै रोजी थेरगाव येथील ओशियन मिडोज सोसायटी येथे आणखी एक फ्लॅट फोडल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्याने १३४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. तीन दिवसांमध्ये दोन घरफोड्या झाल्या. यामध्ये चोरट्यांनी २५ तोळ्यांचे दागिने चोरून नेले. वाकड पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन पथकांनी तपास सुरु केला. एका नामांकित हॉटेलमधील वेटरने एका इसमाची संशयास्पद हालचाल असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी आरोपीची माहिती काढली. त्यानंतर आरोपी अनिल याला उत्तर प्रदेश मधील जैनपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने हे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला याप्रकरणी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपीकडून पोलिसांनी २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. आरोपी अनिल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबईमधील वाळीव पोलिस ठाण्यात तीन आणि पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एक असे एकूण चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अनिल उत्तर प्रदेशमधून विमानाने पुण्यात येऊन नामांकित हॉटेलमध्ये राहत असे. दरम्यान, या काळात तो आसपासच्या परिसरातील बंद फ्लॅटची पाहणी करून दिवसा घरफोडी करीत असे. चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट तो शहरातच लावायचा. त्यानंतर पुन्हा विमानाने गावी जात होता.