पिंपरी : घरगुती वापराच्या गॅसची चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मोठ्या सिलिंडरमधून चार किलोच्या सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने हा गॅस भरला जात असताना पोलिसांनी छापा टाकला. रावेत येथे बुधवारी (दि. १७) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात ९० हजार ७१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीविरूध्द रावेत पोलीस चाैकी येथेम गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
पोपट सोमा ढेकळे (रा. थेरगाव), असे आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील सिद्धार्थ पुष्पा प्रायव्हेट गॅस एजन्सी नावाच्या दुकानात घरगुती वापराचा गॅस मोठ्या सिलिंडरमधून काढून चार किलोच्या सिलिंडरमध्ये धोकादायकपद्धतीने भरून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १७ हजार ६६० रुपयांची रोकड, १२ हजार २२० रुपयांचा गॅस मुद्देमाल, ३०० रुपये किमतीचे दोन पितळी रिफिल, २० हजार ५०० रुपयांचे दोन मोबाईल, ४० हजार रुपये किमतीची एक दुचाकी, असा एकूण ९० हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी अनंत यादव, संदीप गवारी, संतोष असवले, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, संतोष बर्गे, महेश बारकुले, विष्णू भारती, मारुती करचुंडे, दीपक साबळे, गणेश कारोटे, संगीता जाधव, वैष्णवी गावडे, मारोतराव जाधव, योगेश तिडके, योगिनी कचरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.