पिंपरी : मोबाईल कंपनीच्या इंटरेनेटची केबल टाकण्याचे आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्यांना प्रति महिना २० हजार रुपयांचा हप्ता द्या अन्यथा तुमचे हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करू, अशी धमकी देण्यात आली. ही घटना डिसेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत फेज-२ आयटी पार्क, मुळशी येथे घडली. या प्रकरणी रोहीत संजय शिवले (वय २३, रा. सोमवार पेठ) यांनी मंगळवारी (दि.१३) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी गणेश ओझरकर (रा. माण, मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यांची एअरटेल कंपनीच्या वतीने इंटरनेट केबल पुरवण्याचे व दुरस्तीचे काम पाहतात. त्यांच्या कंपनीच्या केबल जोडणीचे काम करणारे करण शिंदे यांना तसेच इतर कामगारांना जर काम करायचे असेल तर दर महा २० हजार रुपये खंडणीची मागणी आरोपीने केली. खंडणी दिली नाही तर केबल तोडून टाकण्याची तसेच तर कामागारांचे हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करीन, अशी धमकी आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.