पिंपरी : चिंचवड मतदारसंघाच्या स्थापनेपासून २००९, २०१४ व २०१९ या सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप विजयी झाले. त्यांनी १९८६ पासून केलेल्या विकासकामांमुळे व सहानुभूतीने पत्नी अश्विनी जगताप या ३६ हजारांच्या मताधिक्याने पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. जर भाजपने चिंचवडमध्ये ‘जगताप पॅटर्न’ बदलला असता, तर इथेही कसब्यासारखे यश महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले असते.
चिंचवड मतदारसंघात गावकी- भावकीचे राजकारण चालते. त्यामुळेच चिंचवड मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या चारही निवडणुकांत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार हे गाववाले राहिले असून, ते एकमेकांचे नातेवाईकही आहेत. त्यामध्ये जगताप यांच्या भावकीपेक्षा काटे, कलाटे व बारणे यांची भावकी मोठी आहे. तरीही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मित्रमंडळ व नातेवाइकांचा गोतावळा आणि तोही विविध राजकीय पक्षांमध्ये असल्याचा दिसून येतो. त्याचा फायदा चिंचवडमध्ये ‘जगताप पॅटर्न’ विजयी होण्यासाठी त्यांना निश्चितपणे होतो. गेल्या काही निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर ते आणखी स्पष्ट होते.
...असा आहे चिंचवडमध्ये जगताप पॅटर्न
१) २००९ च्या चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची उमेदवारी भाऊसाहेब भोईर व भाजप- शिवसेना युतीची श्रीरंग बारणे यांना मिळाली. मात्र, विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण जगताप हे आघाडीतून बंडखोरी करून अपक्ष निवडून आले.२) २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष वेगवेगळे लढले. त्यावेळी लक्ष्मण जगताप यांनी १ लाख २३ हजार मते घेतली. त्यावेळी २०२३ च्या पोटनिवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादीतून नाना काटे (४२ हजार) व शिवसेनेतून राहुल कलाटे (६३ हजार) हे विरोधी उमेदवार होते. मात्र, त्यांच्या दोघांचे मिळून एक लाख ५ हजार मतदान होते.३) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप (भाजप) यांना १ लाख ५० हजार मते आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष व शिवसेनेचा छुपा पाठिंबा मिळूनही राहुल कलाटे (अपक्ष) यांना एक लाख १२ हजार मते मिळाली होती.४) २०२३ च्या पोटनिवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली. अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार, राष्ट्रवादीचे नाना काटे यांना ९९ हजार आणि अपक्ष राहुल कलाटे यांना ४४ हजार मते मिळाली. २०२३ च्या निवडणुकीत पुन्हा २०१४ चा पॅटर्न दिसून आला.