पिंपरी : वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. या भागातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. त्याची पहिली सुरुवात पर्यायी दोन रस्त्यांनी करण्यात येणार आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे १२ आणि १८ मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत.हिंजवडीत आयटी पार्क सुरू झाल्यानंतर या परिसरासह पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख आणि पिंपळेगुरव परिसरातील नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. हिंजवडीकडे जाणारे प्रमुख रस्ते विकसित करण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले. मात्र, आता हे प्रमुख रस्तेही अपुरे पडू लागल्यामुळे वाकड, हिंजवडी भागातील सर्वच रस्त्यांवर दररोजच्या वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. त्यामुळे चाकरमान्यांसोबतच सामान्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या विषयी लोकमतने वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे. तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा विषय अधिवेशनात मांडला होता.आमदार जगताप म्हणाले, ‘‘वाकड व हिंजवडी भागातील वाहतूककोंडीचा विचार केल्यास प्रमुख रस्त्यांना जोडणारे पर्यायी मार्ग तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर अनेकदा चर्चा केल्यानंतर विकास आराखड्यात अनेक पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. अशा सर्व रस्त्यांची माहिती घेतल्यानंतर ते विकसित करण्यासाठी येणाºया अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंजवडीकडे जाण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यासोबत बैठका घेऊन आणि चर्चेतून हे दोन रस्ते तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता केली आहे. त्यानुसार वाकडजकात नाका ते हिंजवडी हा १२ मीटर रुंदीचा आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी हा १८ मीटर रुंदीचा असे दोन रस्ते तयार केले जाणार आहेत. हे दोन्ही रस्ते पर्यायी रस्ते असतील. त्यामुळे वाकड आणि हिंजवडी भागात होणारी वाहतूककोंडी कमी होईल. स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनीही या रस्त्याला संमती दिली आहे.
हिंजवडीसाठी वाकडमध्ये दोन पर्यायी रस्ते करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 7:03 AM