पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पकडण्यात येणारे साप ठेवण्यासाठी सध्या महापालिकेची यंत्रणा नसल्याने हे साप ठेवायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात ठिकठिकाणी घोणस, नाग, धामण, मण्यार, कवड्या, तस्कर या जातीचे साप आढळतात. यामध्ये नाग, मण्यार, घोणस हे विषारी साप आहेत. शहराच्या विविध भागांत आढळणारे साप पकडण्यासाठी यापूर्वी महापालिकेकडून आठ प्रभागांमध्ये मानधन तत्त्वावर आठ सर्पमित्र नेमण्यात आले होते. सारथीसह महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे त्यांचे संपर्कक्रमांकही उपलब्ध होते. त्यामुळे कुठेही साप आढळल्यास त्यांना संपर्क केल्यास साप पकडला जायचा. संबंधित नागरिकाला याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क अदा करावे लागत नव्हते. मात्र, काही महिन्यांपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, हे सर्पमित्र साप पकडून चिंचवड, संभाजीनगर येथील सर्पोद्यानात सुपूर्त करीत होते. मात्र, सध्या येथे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने जागा उपलब्ध नाही. पकडलेले साप ठेवले जात नाहीत.- शहरात दरदिवशी आठ ते दहा साप आढळतात. यामध्ये विविध जातींच्या सापांचा समावेश असतो. घोणस, धामण, नाग, कुकडी, तस्कर या जातींचे साप आढळण्याचे प्रमाण अधिक आहे.साप पकडण्यासाठी कधी कधी दूर अंतरावर जावे लागते. येण्या-जाण्यासाठी स्वत:लाच खर्च करावा लागतो. अशावेळी महापालिकेने मानधन दिल्यास आर्थिक हातभार लागण्यास मदत होऊ शकते.- रवी भोसले, सर्पमित्र.
महापालिकेची यंत्रणा नसल्याने शहरात पकडलेले साप ठेवायचे कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 4:05 AM