लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : उद्योगपतींनी पुढे येऊन सीएसआरच्या माध्यमातून देशसेवा करावी व पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सीएसआर बैठकीच्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर,मराठा चेंबर आॅफ कॉमर्स व अग्रीकल्चर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, अनंत सरदेशमुख, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, रवींद्र दुधेकर, सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, डॉ. महेशकुमार डोईफोडे, मिनीनाथ दंडवते, अण्णा बोदडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, बजाज आॅटोचे एस. के. मुखर्जी, थायसन क्रुपचे आर.एस. नागेशकर, उपस्थित होते. जगताप म्हणाले, ‘‘भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांकडून नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण होत असल्याने त्याला राजा समजले जायचे. आता औद्योगिक विकासामुळे व्यापार व उद्योग क्षेत्राला मोठे स्थान निर्माण झालेले आहे. त्यामुळे उद्योजकांनी समाजाच्या सामाजिक उपक्रमासाठी सीएसआरच्या माध्यमातून सहकार्य करावे.’’ सावळे म्हणाल्या, ‘‘महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावला पाहिजे. मुलांना इंग्रजी शिकविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. देशात मोठ्या प्रमाणात महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या आजाराने पीडित आहेत. ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधे महाग असल्याने गरीब कुटुंबांना ती परवडत नाहीत. या दोन्ही कामांसाठी सीएसआरच्या माध्यमातून सहकार्य करावे.’’ एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावे. नवे प्रकल्प राबविता येतील.महापौर काळजे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पहिल्यांदाच सीएसआरबाबत अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन केले आहे. उद्योजकांनी सीएसआरमार्फत विविध कामे केली आहेत व काही सुरू आहेत. परंतु पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्पांसाठी सहकार्याचा हात द्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी या वेळी केले. हर्डीकर म्हणाले, ‘‘या शहरात मोठ्या प्रमाणात कारखानदारी अस्तित्वात असून, शहरातून तीन नद्या वाहत आहेत. या शहरात काम करण्यास भरपूर वाव आहे. येत्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येईल. शहरामध्ये प्रभावीपणे स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी सारथी हेल्पलाइन सुविधा २४ तास उपलब्ध आहे. या शहरातील सीएसआरच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही या वेळी त्यांनी केले. महानगरपालिकेने सीएसआरसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून, लवकरच तो कार्यान्वयीत करण्यात येईल.’’
विकासात योगदान हवे
By admin | Published: July 03, 2017 3:11 AM