पिंपरी : ‘व्हॅलेन्टाईन -डे’ अर्थात प्रेमदिनाचा मुहूर्त साधत पिंपरीतील भाटनगरमध्ये राहणाऱ्या तरूणीचा विवाह निश्चित झाला आहे. येरवड्यातून नवऱ्या मुलाला घेऊन वऱ्हाडी मंडळी गुरूवारी येणार असून काळेवाडीत दुपारी १२ वाजता हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र कंजारभाट समाजातील काही तरूण, तरुणी समाजातील कुप्रथांविरूद्धचा लढा देण्यासाठी पुढे आल्यामुळे अशा विवाह समारंभात भांडणे घडवुन आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक विवाह समारंभावेळी गोंधळ करण्याची कुणकुण लागल्याने मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडेलग्न समारंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा.अशी मागणी केली आहे. अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली.
कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्याचा दृढनिश्चय करून पिंपरी-चिंचवडमधील भाटनगर येथे राहणाऱ्या ऐश्वर्या तमाईचीकर या तरुणीने स्वत: कृतिशील पाऊल टाकले. कौमार्य चाचणीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी कंजारभाट समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणींचा ‘स्टॉप दि व्ही व्हर्चुअल’ हा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे. त्यावर अनिष्ट प्रथांना हद्दपार करण्याची जनजागृती मोहीम राबवली जात आहे. समाजातील जात पंचायत, तसेच कुप्रथांविरुद्धचा लढा सुरू केला. त्यात महिलांच्या कौमार्य चाचणीविरुद्ध तिने व ग्रुपमधील सहकाऱ्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली. जात पंचायतीचे पंच आणि ज्यांना समाजात परिवर्तन नको अशांनी या ग्रुपला कडाडून विरोध केला. कृष्णा इंद्रेकर, कृष्णा चांदगुडे, प्रियंका तमाईचीकर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्याबरोबर ऐश्वर्याने न डगमगता लढा सुरूच ठेवला आहे. समाजाचा विरोध पत्करून परिवर्तनाचे पाऊल टाकण्याचा निर्धार केलेल्या ऐश्वर्या आणि विवेकचा १३ मे २०१८ ला पिंपरीत कडक पोलीस बंदोबस्त विवाह झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला.जात पंचायत आणि जुन्या प्रथांबाबत आग्रही असलेल्या समाजातील काही लोकांकडून या सामाजिक परिवर्तनाविरूद्ध छुप्या कारवाई सुरूच आहेत. त्याचाच परिणाम विविध समारंभावर जाणवू लागला आहे. विशेषत: लग्न समारंभावेळी त्यांची ही अवस्वस्थता अधिक जाणवू लागल्याचे निदर्शनास आले आहे.