पिंपरी : घरातील व्यक्ती मतदान करण्यासाठी गेल्यानंतर बंद असलेले घर चोरट्याने फोडले. घरातून दोन लाख ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी येथील उद्यमनगरमध्ये सोमवारी (दि. १३) दुपारी तीन ते पावणे चारच्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेऊन चोरट्याला बारा तासात अटक केली.
रोहन रानोजी शिंदे (२३, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रोहन याला बुधवारी (दि. १५) पिंपरीतील नेहरुनगर येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पिंपरी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. उद्यमनगर, पिंपरी येथील उद्यमनगनमधील श्रुती एन्क्लेव्ह या सोसायटीत राहणारे दीपक मुरलीधर वाघमारे हे दुपारी तीन वाजता त्यांच्या घराला कुलूप लावून मतदान करण्यासाठी गेले. ते पावणे चारच्या सुमारास मतदान करून परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या स्थितीत होते. त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या घरातून सोन्याचे ३२ ग्रॅम दागिने, स्मार्टवॉच व दोन मोबाईल हँडसेट असा एकूण दोन लाख ३७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळले.
वाघमारे यांनी तत्काळ पिंपरी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ तपासाला सुरुवात केली. पिंपरी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे सहायक निरीक्षक दिगंबर अतिग्रे आणि त्यांच्या पथकाने संशयिताचा शोध सुरू केला. तसेच वाघमारे यांच्या सोसायटीचे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून रोहन शिंदे हा परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. त्यावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेला दोन लाख ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बीड येथे जाण्याच्या तयारीत असताना केले जेरबंद
रोहन शिंदे हा पोलिस रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी वाहन चोरी, इतर मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला होता. याप्रकरणी तो दीड महिन्यापासून जेलमध्ये होता. तीन दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने घरफोडी केली. घरफोडी केल्यानंतर रोहन हा बीड येथे जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.