लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार ३ आँक्टोबर २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास घडला होता. तब्बल ७ महिन्यांनंतर आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणारे चोरटे गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत अहमदनगर येथून दोघा जणांना ताब्यात घेतले होते. राहुल भागवत गावंडे व सोमनाथ अशोक गावंडे ( रा. धामणगाव आवारी , ता. अकोले ,जि. अहमदनगर )असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा मुलामा असलेला हा कळस होता. सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा हा कळस एका भक्ताने देवीला अर्पण केला होता.मात्र, एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला गेल्यानंतर देवस्थानमध्ये मोठा गदारोळ झाला होता. ग्रामस्थ व ट्रस्ट असा वाद विकोपाला गेल्याने कळसाचे राजकारण झाले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सदरच्या मंदिराच्या कळसाची चोरी करणार्यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे होते. मध्यंतरी हा तपास सीबीआयकडे देखील देण्यात आला होता. सध्या एलसीबीच्या पोलीस निरीक्षक पदावर असलेले पद्माकर घनवट यांनी पदभार स्विकारताच या घटनेचा छडा लावण्याचा चंग बांधला होता. त्याप्रकरणाचा तपास करत असताना नगर जिल्ह्यातील दोन जणांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी कळस चोरीची कबुली दिली. मंगळवारी (दि. ७ मे ) सकाळी एलसीबी पथकाने स्थानिक ग्रामस्त व पोलीस मित्र यांना सोबत घेत एकविरा देवीच्या डोंगरात शोध घेत चोरट्यांनी लपविलेला कळस हस्तगत केला. याप्रकरणाची माहिती देण्याकरिता पुणे ग्रामीण कार्यालयाच्या कृष्णा सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.चोरटे हे ठाकर समाजाचे असून एक जण सेंटरिंगचे काम करतो तर दुसरा शेती काम करतो. ते दोघे आळंदी येथे आले असता त्यांनी यु ट्युब वर एकविरा देवीचे गाणे पाहिले होते. या गाण्यात देवीचा कळस सोन्याचा दिसत असल्याने त्यांनी कळस चोरीचा चंग बांधला. त्यानुसार ३ आँक्टोबर रोजी कळसाची चोरी केली. मंदिराचा पठारावर बसून त्यांनी कळस घासला असता तो सोन्याचा नसून धातूचा असल्याचे समजल्याने त्यांनी कळस चोरून न नेत तेथेच डोंगराच्या एका नाल्यात लपवून ठेवला व पुन्हा गड उतरुन ते निघून गेले अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडून गुन्ह्याचा तपास पूर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला असून या पथकाला ३५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, शरद कांबळे, सचिन गायकवाड, गणेश महाडीक, रऊफ इनामदार, चंद्रशेखर मगर, अक्षय जाबळे यांनी केला.