देहूरोड : नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन मोहिमेत पोलिसांनी पकडलेल्या तीन चोरट्यांपैकी एकाने मला सोडा नाहीतर जीवे मारणार असल्याचे सांगत पोलिस कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार करून जखमी केले. त्यानंतर त्या आरोपीने स्वत:ही गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. देहूरोड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे हवालदार प्रीतम वाघ यांनी फिर्याद दिली असून, ते चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. बुगी ऊर्फ मोमीन सलीम शेख (वय २०, रा. गांधीनगर, देहूरोड) या आरोपीने वाघ यांच्यावर हल्ला केला. तसेच स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोमीनसह त्याचे दोन साथीदार सुरेश मुन्ना अवचिते (वय २२, रा गांधीनगर, देहूरोड), विकी राजू कांबळे (वय २२, देहूरोड) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री सव्वाएकच्या सुमारास श्री शिवाजी विद्यालय परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. हवालदार वाघ यांना आरोपी आढळून आले. पोलीस निरीक्षक अरुण मोरे,सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, हवालदार विनोद शिंदे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (वार्ताहर) तीन आरोपींकडून १८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना घेऊन जात असताना मोमीन शेख याने कंबरेजवळ लपवलेले ब्लेड काढून ‘मला सोडा अन्यथा तुम्हाला जिवे मारीन’, अशी धमकी देत वाघ यांच्यावर वार केले. तसेच स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शेखला त्या ठिकाणी हवालदार विनोद शिंदे यांनी पकडले.
चोरट्यांनी केला पोलिसावर हल्ला
By admin | Published: August 19, 2016 6:12 AM