पिंपरी : औद्योगिक परिसरातील चोऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चोरीचे सीसीटीव्ही चित्रण देऊनही चोरट्यांचा छडा लावण्यात आणि चोरीचा माल हस्तगत करण्यात अपयश येत आहे. परिरासरात वारंवार चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, गस्ती पथक नेमावे अशी मागणी पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने 'विधिसंघर्ष बालकांचे पुनर्वसन' या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना औद्योगिक परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत निवेदन दिले.
बाल गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यांना शिक्षण देण्यासाठी तसेच रोजगार मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्याचे आश्वासन संघटनेच्या वतीने देण्यात आले. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, सोनावणे वस्ती, कुदळवाडी, चिखली, शांतीनगर, प्राधिकरण भाग ७ ते दहा, एमआयडीसी भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या औद्योगिक परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे टोळक्याने येऊन सुरक्षा राक्षकला शास्त्राचा धाक दाखवून चोरी करतात. अशा वेळी सुरक्षा रक्षक प्रतिकार करू शकत नाही. पोलिसांच्या सांगण्यावरून उद्योजकांनी परिसरात सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र चोरीचे छायाचित्रण देऊनही चोर अथवा चोरीच्या मालाचा तपास लागला नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पोलीस दप्तरी औद्योगिक परिसरात चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची नोंद आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे. महिला कामगारांच्या छेडछाडीच्या प्रकार वाढले आहेत. सोनसाखळी हिसकवण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे अतिरिक वेळ काम करण्यास महिलावर्ग राजी होत नाही. पुरुष कामगारांना अडवून लुटले जाते. त्यामुळे कामावर येण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत गस्त वाढवावी अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
-----
माथाडी कामगारांचा त्रास
अनधिकृत माथाडी कामगार संघटना अनेकदा हप्ते मागतात, आमच्या संघटनेचे कामगार कामावर ठेवा म्हणून आग्रह धरतात. कंपनीमध्ये चोरी होईल या भीतीने उद्योजक तक्रार देण्यास धजावत नाही.
-----
कायमस्वरूपी गस्ती पथक नेमावे..
पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेने २०१३ साली प्रायोगिक तत्वावर गस्ती पथक स्थापन केले होते. त्यावेळी चोरीच्या प्रमाणात घट झाली होती. पुढे आर्थिक कारणास्तव हा उपक्रम बंद झाला. सध्याच्या स्थितीत अशी योजना राबविणे उद्योजकांना शक्य नाही. पोलीस ठाणे अंतर्गत ही योजना राबवावी अशी मागणी उद्योजक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.