पिंपरी : शहरात सोनसाखळी हिसकावण्याच्या प्रकारासह चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जबरी चोरी तसेच चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी १५ लाख ६८ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शनिवारी (दि. २२) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले.
बिभिषण बाळकिसन खराटे (वय ३३, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घराच्या हॉलमध्ये धान्याच्या ड्रमवर लाकडी फळी ठेवून त्यावर ठेवलेल्या स्टीलच्या डब्यात सुरक्षित ठेवलेले २२ हजार रुपयांचे १९ ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. घराच्या उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केली. हा प्रकार शनिवारी (दि. २२) सकाळी आठच्या सुमारास घडला.
जोगिंदर जयभगवान मित्तल (वय ४६, रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घरातून १५ लाख १६ हजार रुपये किमतीचे ३७९ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. फिर्यादीच्या घरी काम करणाऱ्या चार महिलांपैकी कोणीतरी हे दागिने चोरून नेले, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. हा प्रकार २२ डिसेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत घडला.
दुचाकीस्वार महिलेची सोनसाखळी हिसकावली
मृदुला संजय सिद्धेश्वर (वय २७, रा. हिंजवडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांची बहीण हे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून दौंड मार्गे हिंजवडी येथे परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने ओढून हिसकावून चोरून नेले. वाकड येथे शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.