देहूगाव : येलवाडी (ता. खेड) गावच्या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. परिसरात गस्त घालावी, अशी मागणी वारंवार करूनही पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शनिवारी येथील सरपंच नितीन सखाराम गाडे यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, घरातील माणसे वेळीच जागी झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. मात्र, त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या आनंदा नथू गाडे यांच्या बंद घरातील बल्ब फोडून घरातील सामानाची तोडफोड केली असून, सुमारे दोन हजार रुपये चोरीस गेले. शंकर गायकवाड यांच्याही घराचा कडी-कोयंडा उचकटून घरातील रोख सुमारे तीन हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेली. संतोष शिवाजी गाडे यांच्या घरातील तीन हजार रुपये चोरून नेले व एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओढून नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आरडाओरड केल्याने त्यांचा तो प्रयत्न फसला. त्यांच्या घरामध्ये चोरी करण्याची तिसरी वेळ आहे. यापूर्वीही चोरीचे बरेच प्रकार घडले असून, सहा महिन्यांपूर्वी येथील काळुराम गणपत बोत्रे यांची नवीन स्प्लेंडर दुचाकी चोरी गेली. महिन्यापूर्वी दीपक किसन गाडे यांची ३५० सीसी दुचाकी चोरी गेली. एक महिन्यापूर्वी कैलास बबन गाडे यांचे साडेचार लाख रुपये चोरीस गेले होते. या सर्व चोरी झाल्याची तक्रार चाकण पोलीस स्टेशनला दिलेली असल्याची माहिती मिळाली आहे. या भागातच वारंवार चोरीचे प्रकार घडत असल्याने येथील लोक भयभीत असून, रात्री घरातून बाहेर पडण्यासही ते तयार नाहीत. गावात रात्री संचारबंदीची स्थिती आहे. जवळच चाकण-तळेगाव हा वर्दळीचा रस्ता असल्याने चोरट्यांना सहजपणे पलायन करणे शक्य होते. असेही काही ग्रामस्थांनी सांगितले.गेल्या तीन महिन्यांत चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावात व परिसरात गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, त्याकडे पोलीस सातत्याने दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
येलवाडी परिसरात चोऱ्या
By admin | Published: December 13, 2015 11:42 PM