पिंपरी : प्रमुख राजकीय पक्षांनी बहुतांश ठिकाणी अ,ब,क,ड या गटवारीनुसार प्रभागांमध्ये चार उमेदवारांचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले आहे. प्रचारात हे पॅनेल एकत्र फिरत असले, तरी जो तो स्वत:पुरता विचार करताना दिसत आहे. विद्यमान नगरसेवकांंमधील काही उमेदवार ‘माझ्या एका नावाचा विचार करा, बाकी ठिकाणी जे करायचे ते करा,’ असे सांगत एका मताचा जोगवा मागताना दिसत आहेत. त्यामुळे मतदारांनाही आश्चर्य वाटत असून, पॅनल पध्दतीमध्ये क्रॉस व्होटींग संकेत मिळत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीअर्जदाखल केलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी ऐनवेळी एबी फॉर्म दिले. त्यामुळे कोणत्याच राजकीय पक्षाला नियोजनानुसार पॅनल तयार करता आले नाही. अनेकांना अचानक प्रमुख राजकीय पक्षाची उमेदवारी न मागता मिळाली. काहींना जोरदार फिल्डिंग लावूनही उमेदवारी मिळाली नाही. परिणामी पॅनेल जुळविण्याचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. गत निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीची होती. त्या वेळी निवडून आलेल्या एकाच पक्षाच्या दोन नगरसेवकांचे पाच वर्षांत कधी पटले नाही. एकमेकाला कायम पाण्यात पाहणारे, एकमेकांच्या टक्केवारीवर डल्ला मारण्याचेप्रकार घडले असल्याने असा सहकारी नगरसेवक नकोरे बाबा असे म्हणण्याची ज्यांच्यावर वेळ आली होती, त्यांना पुन्हा अशाच सहकारी उमेदवाराला पॅनलमध्ये बरोबर घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. सांगता येत नाही, बोलताही येत नाही, अशी अनेकांची गत झाली आहे. (प्रतिनिधी)
माझा विचार करा, बाकी जे करायचे ते करा!
By admin | Published: February 13, 2017 1:56 AM