नारायण बडगुजर-
पिंपरी : ऑनलाईन क्लास सुरू असताना १३ वर्षांचा आयुष तापकीय हा मुलगा म्हशीला तलावावार घेऊन गेला. त्यावेळी तलावात बुडणाऱ्या तीन मुलांना त्याने पाण्याबाहेर काढले. त्यातील दोघांचा जीव वाचला. आयुषच्या या धाडसाने दोन मुलांना ‘आयुष्य’ दिले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आयुषने तलावात उडी मारली. त्याच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
आयुष तापकीर हा त्याच्या कुटुंबियांसह भोसरी येथील सद्गुरूनगर परिसरात वास्तव्यास आहेत. वडील गणेश, आई मोठा भाऊ राेहीत, आजी, दोन चुलते, चुलत्या, तसेच चुलत भाऊ व बहिण असे त्यांचे एकत्र कुटुंब आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आयुषचे वडील गणेश हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. आई ब्युटिशियन आहे. शेती व्यवसाय असल्याने तापकीर कुटुंब गुरांच्या पालनाचा जोड व्यवसाय करतात. त्यात त्यांच्याकडे म्हशी, बैल, गायी आहेत.
इयत्ता आठवीत असलेला आयुष हा शाळा बंद असल्याने मोबाइलवर ऑनलाईन क्लासला हजेरी लावतो. सोमवारी दुपारी तो म्हशींना तलावावर घेऊन गेला. ऑनलाइन क्लास सुरू असल्याने तो झाडाखाली बसला होता. दरम्यान म्हशींना पाहण्यासाठी तलावाजवळ गेला त्यावेळी मुले पाण्यात बुडताना दिसली. याबाबत आयुषयने तेथील एका व्यक्तीला सांगितले. मात्र संबंधित व्यक्तीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आयुषने धाव घेत तलावात उडी मारली. बुडणाऱ्या तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील एकाच्या पोटातील पाणीही पोट दाबून काढले. आणखी एक मुलगा बुडाल्याचे त्या मुलांनी सांगितले. त्यामुळे आयुषने पुन्हा तलावात उडी मारून त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर आयुषने त्याच्या मोबाइलवरून पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि अग्निशामक दलाने चौथ्या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
दोन वर्षांचा असताना जलतरणाचे धडेआयुष हा दोन वर्षांचा असताना घरच्यांनी त्याला जलतरण तलावात पोहण्याचा सराव करून घेतला. त्यानंतर सदगुरुनगर येथील तलावात देखील तो पोहायचा. त्यामुळे त्या तलावाचा त्याला अंदाज आहे. आयुषला घोडसवारीसह कुस्तीची आवड आहे. कुस्तीमध्ये त्याने दोन सन्मानचिन्ह तर दोन पदके मिळविली आहेत. सतत काहीतरी करण्याची त्याची धडपड असते, असे भाऊ राेहीत तापकीर यांनी सांगितले. मला कळल्यानंतर धडधड वाढली. आयुषला आणा, मला त्याला पाहायचे आहे, असे त्याच्या आजी ताराबाई तापकीर यांनी सांगितले. आयुषच्या धाडसाचे आता कौतुक वाटत आहे, असे आई शितल तापकीर म्हणाल्या.
शौर्याचा अत्युच्च आदर्श; शौर्य पुरस्काराची अपेक्षाबाल्यावस्थेत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आयुष तापकीर याने तीन मुलांना तलावातून बाहेर काढले. त्यातील दोघांचा जीव वाचला. शौर्याचा अत्युच्च आदर्श त्याने निर्माण केला. अशा शौर्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय स्तरावर बाल शौर्य पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी आयुष याला सन्मानित करण्यात यावे, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
मुले बुडताना पाहून मला सुरवातीला घाबरल्यासारखे वाटले. पण त्यांना पाण्यातून बाहेर काढायचे म्हणून तलावात उडी मारली. एकाला हाताने धरून बाहेर काढले, दुसऱ्यालाही तसेच काढले. तिसरा मुलगा बुडताना दिसला त्याला ओढून काढले. त्यानंतर एकाच्या पोटात पाणी असल्याचे दिसले. पोट दाबून पाणी काढले.मात्र तिसरा मुलगा शुद्धीत नव्हता. त्याचेही पोट दाबून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो शुद्धीवर आला नाही.- आयुष तापकीर, भोसरी