पिंपरी : ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी करून मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्या १७८ चालकांवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ माहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहराच्या प्रमुख चौकांत, तसेच हॉटेलातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर वाहतूक पोलिसांनी ‘ब्रेथ अॅनालायझर’च्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली. त्यात मद्याच्या अमलाखाली अनेकजण आढळून आले. दि. ३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जणांनी हॉटेल, पब, ढाबे आदी ठिकाणी दारू पिऊन रस्त्यावर वाहने चालवली. मद्याच्या धुंदीत त्यांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. परिणामी, अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात; याला आळा बसावा, याकरिता वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपरी ३७, चिंचवड ११, निगडी १६, भोसरी १४, चतु:शृंगी १४, सांगवी २० आणि हिंजवडी परिसरात ६६ मद्यपी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. आयटी परिसर असलेल्या हिंजवडी परिसरात सर्वाधिक ६६ मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे, तर चिंचवड परिसरात सर्वांत कमी ११ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन परवाना न बाळगणाऱ्या, बेकायदा वाहतूक करणाऱ्या ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
थर्टी फर्स्ट पार्टीतील मद्यपींची उतरली झिंग
By admin | Published: January 02, 2017 2:18 AM