पुणे : अकरावी प्रवेशाच्या तिसºया फेरीअखेर ५१ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे, तर अद्यापही ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तिसरी फेरी संपल्यानंतरही मोठ्या संख्येने प्रवेश न मिळू शकल्याने विद्यार्थी व पालक धास्तावले आहेत. केंद्रीय प्रवेश समितीने या प्रक्रियेत योग्य तो हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली.चौथ्या फेरीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे. आता केंद्रीय प्रवेशाच्या २९ हजार ५६० तर कोट्यांतर्गत १५ हजार ४४ अशा एकूण ४१ हजार ८०६ जागा रिक्त आहे. प्रवेश अर्जापेक्षा जागांची संख्या जास्त असली, तरी विद्यार्थ्यांना सोयीचे महाविद्यालय मिळू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तिसºया फेरीमध्ये काही प्रवेश होऊ शकले. त्यामुळे आता चौथ्या फेरीत ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. चौथ्या फेरीची गुणवत्तायादी ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल.रिक्त जागांचा तपशील व महाविद्यालयांचे कट आॅफ वेळापत्रकानुसार बुधवारी जाहीर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते जाहीरच करण्यात आले नाही.अकरावीसाठी एकूण ८० हजार ९०४ अर्ज प्रवेश समितीकडे आले. केंद्रीय प्रवेश पद्धतीने ३९ हजार ७५० विद्यार्थ्यांनी, तर कोट्यांतर्गत ११ हजार ८३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तिसºया फेरीसाठी ३५ हजार १७३ विद्यार्थ्यांचे समितीला प्राप्त झाले होते. दुसºया फेरी अखेरपर्यंत ४७ हजार २० विद्यार्थ्यांना आतापर्यंत महाविद्यालयात प्रवेश मिळाले आहेत.चौथ्या फेरीमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकावेत, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. आॅनलाइन प्रवेशअर्ज भरायचा राहिला असल्यास त्यांनाही अर्ज भरण्याची संधी शुक्रवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध आहे.पहिला पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी लटकले-अकरावी प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांना दिलेल्या वेळात प्रवेश घेता न आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज बाद करण्यात आले आहेत. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील चुकांमुळेही काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधातरी बनले आहे. चौथी फेरी संपल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा विचार करू अशी भूमिका केंद्रीय समितीने घेतली आहे.
तीस हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:55 AM