पिंपरी : आघाडी सरकारचे करायचं काय खाली डोके वर पाय... उषःकाल होता होता, काळ रात्र आली.. ही काळरात्र महाआघाडी सरकारने आणली... अशा घोषणा देत पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे पिंपरी येथे कंदील मोर्चा काढण्यात आला. संपुर्ण महाराष्ट्रात लोडशेडींग अर्थात भारनियमन लावल्याच्या निषेधार्थ पिंपरी, मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या विरोधात कंदील मोर्चा काढण्यात आला.
महेश लांडगे म्हणाले, ''सातत्याने गेल्या दोन वर्षापासून अघोषित भारनियमनाचा त्रास सुरूच आहे. मात्र या उन्हाळ्याच्या तडाख्यात भारनियमन अधिकच गडद झाले आहे. कोणतीही सूचना न देता वीज आठ ते दहा तास औद्योगिक पट्ट्यामध्ये गायब असते. अशावेळी उद्योजकांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे उद्योजकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर उद्योजक आधीच खचलेले असताना त्यात आता लोडशेडिंगचे दुखणे त्यांच्यामागे सुरू झाले आहे. यातून उभारी कशी घ्यावी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शिवाय नागरिकांना देखील याची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत अशा काळात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रहिवासी पट्ट्यातील वीज गायब असते. मुलांनी परीक्षा कशा द्याव्या. अभ्यास कधी करावा. पुरेशी झोप कशी घ्यावी असा देखील प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.एक प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांचे नुकसान करून महाविकास आघाडी सरकार देशाचे भविष्य आणि वर्तमान दोन्ही खराब करत आहेत.