पिंपरी : यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा ३५० वा आहे की नाही, याविषयी समाज माध्यमांवर वाद प्रतिवाद केले जात आहेत. मात्र, यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा हा ३५० वा असून समाजमाध्यमांवर तो ३५० वा नाही असे म्हटले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करा. संपूर्ण वर्ष आपल्याला साजरे करायचे आहे. हा जो शक आहे त्यामध्ये योगायोगाने तेरा महिने आहेत. त्यामुळे हा सुकाळातला तेरावा महिना आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.
मुळशीतील अनिल पवार यांच्या पुढाकाराने शिवराज्यभिषेकाच्या विविध पैलूंवर साकारण्यात येणाऱ्या ग्रंथाच्या माहितीसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदानंद मोरे बोलत होते.
सदानंद मोरे म्हणाले की, राज्यभिषेकाची परंपरा आपल्याकडे होती. मात्र, त्यामध्ये मोठा खंड पडला होता. यादव राजांचे राज्यभिषेक झाले मात्र, त्यानंतर ही परंपरा लुप्त झाली. या परंपरचे पुर्नजीवन शिवाजी महाराजांनी केले. सहाशे ते दोन हजार वर्ष खंडित झालेली शिवाजी महाराजांच्या कृत्याची नाळ ही एकुण भारतीय इतिहासाशी जोडता येते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार, इतिहास अभ्यासक गणेश राऊत, चेतन कोळी, जिंदा सांडभोर, मारुती गोळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नाव सार्थ ठरले
अनिल पवार यांनी सांगितले की, शिवभारत या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. महाराजांच्या जन्मामुळे जनता समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव सार्थ झाले, असा उल्लेख आढळतो. महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगावर पुस्तक आपल्याला मिळून येतात. मात्र, फक्त राज्याभिषेक केंद्रस्थानी ठेवून त्याचे विविध पैलू उलगडून सांगणाऱ्या ग्रंथांची संख्या कमी आहे. ती कमतरता ‘शिवराज्यभिषेक’ मुळे भरून निघेल.