देहूगाव : कार्तिकी एकादशीच्या व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्त आळंदी येथे दर्शन घेतल्यानंतर संतभूमी देहूनगरीतही हजारो भाविकांनी तुकोबांचे दर्शन घेतले. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने शिळामंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, भजनी मंडप, महाद्वार, वैकुंठगमन मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे महापूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भाविकांची पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती.
पहाटे वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीकाठी स्नान केल्यानंतर मंदिरात दर्शन घेतले. इंद्रायणी घाटावर चोख विद्युत व्यवस्था व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दी होत असल्याने भाविकांना दर्शन बारीतूनच दर्शनासाठी सोडण्यात येत होते. महाद्वारातून प्रवेश बंद केला होता. उत्तर दरवाजाने मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांना सोडण्यात येत होते व याच दरवाजाने बाहेर सोडले जात होते. ठिकठिकाणी भाविकांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले. भक्त निवासामध्ये प्रवचन सुरू होते.
वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी व गावातील गर्दी टाळण्यासाठी अवजड वाहने व कामगारांच्या बसेस बाह्यवळण मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. फक्त गावातील वाहने व दुचाकी, ऑटो रिक्षा यांनाच सोडण्यात येत होते. पीएमपीएमएलच्या बसेसही बाह्यवळण मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. परंडवाल चौक, काळोखे पाटील चौक व भैरवनाथ चौकात पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून वाहतुकीचे नियंत्रण केले होते.
गावात येणाऱ्या वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश
परंडवाल चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणचे वाहतूक पोलिस कर्मचारी वाहनांना कोणत्या रस्त्याने जावे याबाबत मार्गदर्शन करत होते. त्यामुळे गावात येणाऱ्या वाहनांची संख्या मर्यादित राहिल्याने गावात गर्दी जाणवत नव्हती. भाविक मोकळ्या रस्त्याने पायी मंदिरापर्यंत सहज प्रवास करीत होते.