पिंपरी : सराफ व्यावसायिकांच्या बंदचा आज आठवा दिवस आहे. एक मार्चपासून सराफ व्यावसायिकांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंदमुळे पिंपरी-चिंचवड शहरात रोजची ६० ते ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कररूपाने जमा होणाऱ्या रोजच्या ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. सोन्यावर एक टक्का उत्पादन शुल्क लादण्यात आल्याच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी १ मार्चपासून बंद पुकारला आहे. जोपर्यंत हे अन्यायकारक शुल्क रद्द करण्यात येत नाही, तोपर्यंत हा बंद मागे घ्यायचा नाही, असा निर्धार सराफ व्यावसायिकांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वीदेखील सराफ व्यावसायिकांकडून बंद पुकारण्यात आला होता. त्या वेळीसुद्धा याच मागणीसाठी तब्बल २२ दिवस सराफ दुकाने बंद होती. विरोधी पक्षाने तेव्हा सराफ व्यावसायिकांना साथ दिली होती. मात्र, आता सत्तेत आल्यावर परत त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी, वाकड, सांगवी, खडकी, दापोडी, भोसरी, नेहरुनगर, पिंपरी, चिंचवडगाव, चिखली, निगडी या भागातील सर्वच सराफ दुकाने बंद आहेत. शहरात सुमारे ४०० छोटे-मोठे सराफ व्यावसायिक आहेत. दोन लाखांहून अधिक कि मतीचे दागिने खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती हा निर्णय सरकाने यापूर्वीच घेतला आहे. या अर्थसंकल्पात हा नियम रद्द केला जाईल किंवा खरेदीची मर्यादा वाढविण्यात येईल, अशी सराफ व्यावसायिकांची अपेक्षा होती. परंतु, तशी कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. याउलट एक टक्का उत्पादन शुल्क लादण्यात आले. (प्रतिनिधी)
साठ कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Published: March 09, 2016 12:36 AM