पिंपरी : पुण्यात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याबाबतचा काॅल आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे आला. त्यानंतर राज्य पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी पुणे दौरा नियोजित होता. मेट्रोसह १२ प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, पावसामुळे माेदी यांचा गुरुवारचा पुणे दौरा रद्द झाला. दरम्यान, गुरुवारी (दि. २६) सकाळी एका अभियंता तरुणाने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा..., त्यांना मदत करा’’, असा कॉल आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला. त्यानंतर राज्य पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
अभियंता तरुण पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील थेरगाव परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी शोध सुरू केला. बसच्या प्रतीक्षेत बसथांब्यावर थांबलेल्या संबंधित अभियंता तरुणाला वाकड पोलिसांनी काही मिनिटांतच ताब्यात घेतले. तरुण मूळचा उदगीर येथील असून तो थेरगाव येथे त्याच्या मित्राकडे आला होता. अभियंता तरुणाने असा कॉल का केला. तसेच, त्याच्याकडे नेमकी काय माहिती आहे, याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांसह राज्य दहशतवाद विरोधी पथकाने देखील या कॉलची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडून देखील समांतर चौकशी सुरू आहे.
हाॅलीवूड चित्रपट, ‘एआय’मुळे केला काॅल?
संबंधित २५ वर्षीय अभियंता तरुण हा हाॅलीवूड चित्रपट तसेच एआयवर आधारित व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. तसेच पंतप्रधान मोदी हे नुकतेच पाश्चिमात्य देशांमध्ये दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी सोशल मीडिया आणि ‘एआय’बाबत वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे वाटले. त्यामुळे काॅल केला, असे प्राथमिक तपासा दरम्यान संबंधित तरुणाने सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्यापही याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.