पिंपरी : प्राॅपर्टी व पैशांसाठी महिलेचा पाठलाग करून धमकी दिली. याप्रकरणी महिलेचा दीर आणि सासू यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चिंचवड येथे १३ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. २३) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिचा दीर आणि सासू यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या नावावर असलेली सर्व प्राॅपर्टी व पैसे हे फिर्यादी महिलेच्या नावावर झाले आहेत. त्याचा राग मनात धरून फिर्यादीचा दीर व सासू हे फिर्यादीला महिलेला प्राॅपर्टी व पैसे त्यांच्या नावावर करण्यास सांगून पैसे देण्यासाठी दबाव आणतात.
फिर्यादी महिला १३ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या दिराने फिर्यादीच्या दुचाकीला त्याची गाडी आडवी लावली. तुझ्या पतीचे तुला मिळालेले पैसे मला दे, तसेच जमिनीचे व फ्लॅटचे हक्क सोडून दे, नाहीतर याचे वाईट परिणाम होतील. तू जर मला पैसे तसेच हक्क सोडून दिला नाहीस तर तुला मी सोडणार नाही व पोलीस, कोर्टकचेरीच्या फेऱ्या मारायला लावीन, असे दिराने धमकावले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.