पिंपरी - मद्याचा कंटेनर पळवून नेल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली. सतीश भानुदास सूर्यवंशी (वय 31, रा. कळाची, ता. इंदापूर), सुरेश सोनेराव ढाकणे (वय 24), समाधान तुकाराम भोसले (वय 32, दोन्ही रा. खवणी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी नावं आहेत.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यामध्ये बनविलेले मद्य राज्यात उत्पादन शुल्क चुकवून आणले जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने एक ऑक्टोबरला रात्री सापळा रचून कंटेनर ताब्यात घेऊन तळेगाव येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घेऊन जात होते. त्यानंतर तेथे दोन चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तींनी दमदाटी केली. तसेच पन्नास लाख रुपयांचे मद्य असलेला कंटेनर घेऊन गेले. मद्य आणि वीस लाख रुपयांचा कंटेनर जबरदस्तीने नेल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक योगेश नानभाऊ फटांगरे (वय ४८, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनीअटक केली असून, त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.