पिंपरी : धुळे येथील तरुणाच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अट्टल गुन्हेगारासह दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. मॅगझिन चौक येथे बुधवारी (दि. ११) ही कारवाई केली. महेश उर्फ घनश्याम पवार, गणेश माळी, जगदीश चौधरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम साळुंखे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पवार सराईत गुन्हेगार आहे. व्यवसायातील बाचाबाचीवरून त्याने साथीदारांसोबत शुभम साळुंखेवर हल्ला केला. कोयता, फायटर व धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ८ ऑक्टोबर रोजी धुळे येथे झालेल्या या घटनेत शुभमचा मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे येथील आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर महेश पवार आणि त्याचे साथीदार पळून गेले होते. ते दिघी येथील मॅगझिन चौकात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना पकडले. त्यांच्याकडून दुचाकी जप्त केली. दरम्यान, धुळे येथील गुन्हे शाखेचेही पथक दिघी येथे दाखल झाले. त्यांच्या ताब्यात संशयितांना देण्यात आले.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर, दिघीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. एन. कटपाळे, मुकुंद कोकणे, कांचन पंडित, सोमनाथ खळसोडे, प्रतीक्षा बच्छाव, प्रियांका लाकूडझाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.