नारायण बडगुजर -पिंपरी : तीन बांबू आणि आकाशाचा तंबू करून सर्कस चालविणाऱ्या नट कुटुंबियांनाही कोरोनाची झळ बसत आहे. बागडण्याचे दिवस असतानाही पोटासाठी खेळ सादर करणाऱ्या दहा वर्षांच्या चिमुकलीच्या कसरतीच्या कलेची कदर कोणालाही नसल्याचे दिसून येते. 'सोशल डिस्टन्सिंग'चा प्रत्यय तेथे येतो. त्यामुळे बिन तिकिटाच्या या खेळासाठी रसिक उरला नसून राजस्थानी नटाची ही सर्कस ओस पडली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राजस्थानी नट कुटुंबे दाखल झाली आहेत. भोसरी येथे त्यांचा मुक्काम आहे. शहरातील विविध भागात काही मिनटांचा खेळ सादर करून मिळेल त्या पैशांवर त्यांची गुजराण होत आहेत. एका कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले असे चार सदस्य आहेत. त्यातही कुटुंबातील मुलगी त्यांच्यातील मुख्य कलाकार आहे. लहानमोठ्या चौकात किंवा रस्त्यावर मिळेल तेथे बांबू उभे करून त्यावर दोर बांधून त्यांच्याकडून खेळ सादर केला जातो. कलाकार असलेली चिमुकली मुलगी विविध कसरती करून खेळ सादर करते आणि नागरिकांचे मनोरंजन करते. मात्र त्यांच्या या खेळाचा आनंद घेण्यासाठी कोणीही थांबत नाही. अवघ्या काही मिनिटांत जिवावर बेतणारी कसरत चिमुकली सादर करते. तरीही त्यात कुणाला रस नसल्याचे दिसून येते. ही सर्कस उघड्यावर असल्याने त्यासाठी नट कुटुंब कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा तिकिट आकारत नाहीत. देणारी व्यक्ती स्वेच्छेने देईल तेवढे पैसे ते स्वीकारतात.
महाराष्ट्राच्या लोककलेत मनोरंजनातून प्रबोधन केले जाते. मात्र मनोरंजनाची पर्यायी साधने उपलब्ध झाली. कोरोना व लॉकडाऊनमुळे सिनेमागृह, नाट्यगृह बंद झाली. त्यामुळे सोशल मीडिया ते ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आणि अल्पावधीत लोकप्रियही झाले. त्यामुळे गल्लोगल्ली रस्त्यावर तीन बांबू आणि आकाशाचा तंबू करणाऱ्या नटाच्या या सर्कशीकडे समाजाने पाठ फिरवली आहे.
आमच्या खेळासाठी रस्त्यावर मोठी गर्दी होत असे. त्यामुळे काहीवेळा वाहनांचा खोळंबा होत असे. आता मात्र एकही जण या खेळाचा आनंद घेत नाही. तरीही आम्ही आमची कला सादर करतो. मिळेल तेवढे पैसे घेतो. आपल्या नशिबात असेल तेवढे आपल्याला मिळेलच.- सुरेंद्र नट, खेळ सादर करणारा राजस्थानी कलाकार