पिंपरी : ‘‘मंत्रालयात ओळख आहे, त्या ओळखीतून तुमचे पेन्शनचे काम करून देतो, ’’ अशी बतावणी करून आरोपीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर काळू बच्छाव यांची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. बच्छाव यांनी आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बच्छाव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पराग संतोष डिंगणकर (वय ३८, रा. सीमा गार्डन हौसिंग सोसायटी, शिक्षकनगर, कोथरूड) याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. डॉ. बच्छाव हे २००८ मध्ये महापालिका सेवेतून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. निवृत्तिवेतन मिळावे यासाठी डॉ. बच्छाव मंत्रालयात पाठपुरावा करीत होते. त्यांची डिंगणकर यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा ‘‘मंत्रालयात माझी चांगली ओळख आहे. मी तुमचे पेन्शनचे काम करून देतो’’ असे सांगत डिंगणकर याने डॉ. बच्छाव यांच्याकडून १५ मार्च ते २७ नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत मंत्रालयातील कामासाठी म्हणून वेळोवेळी रक्कम उकळली.एकूण तीन लाख रुपये दिल्यानंतरही डिंगणकरकडून काम झाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार डॉ. बच्छाव यांनी पोलिसांकडे केली आहे.
निवृत्त अधिका-याची तीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:08 AM