पिंपरी : अल्पवयीनांना आमिष दाखवून तसेच फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. अशाचप्रकारे अल्पवयीन असलेल्या दोन मतिमंद मुलांसह अन्य एका अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. या मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि. २०) गुन्हे दाखल करण्यात आले.
चिंचवडमधील वेताळनगर झोपडपट्टीमधून अज्ञात व्यक्तीने १७ वर्षीय मुलाला फूस लावून पळवून नेले. संबंधित मुलाच्या आईने याप्रकणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार शनिवारी (दि. १८) सकाळी साडेसहा ते सायंकाळी सव्वासहा या कालावधीत घडला.
दगडू पाटीलनगर, थेरगाव येथून १५ वर्षीय गतिमंद मुलगा शनिवारी (दि. १८) सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला. तो घरी परत आला नाही. याप्रकरणी संबंधित मुलाच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या मुलाला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले, असे फिर्यादीत नमूद आहे.
रुपीनगर, तळवडे येथील एका सोसायटीमधून १७ वर्षीय गतिमंद मुलगा रविवारी (दि. १९) दुपारी चारच्या सुमारास बेपत्ता झाला. याबाबत त्याच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या मुलाला फूस लावून अगर पैशांचे आमिष दाखवून पळवून नेले, असे फिर्यादी नमूद आहे.