लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : शहरात काही दिवसांपासून सतत अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे रहाटणी परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने वाहनचालकासह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, रहाटणी येथील महात्मा फुले कॉलनी व भालेराव कॉलनी या ठिकाणी रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचल्याने रहिवाशांना ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर खड्डे व पाणी की, पाण्यात रस्ते म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. अनेक वेळा पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे अधिकारी काणाडोळा करीत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाळा सुरू झाला की, दर वर्षी परिसरातील अनेक अंतर्गत व मुख्य रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडलेले असतात. अनेक ठिकाणचे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. त्याचा वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रस्त्यावर खड्डे किरकोळ प्रमाणात आहेत. मात्र, भालेराव कॉलनीत पावसाळा सुरू झाला, त्या दिवसापासून रस्त्यावर पाणी साचलेले आहे. चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. या परिसरातील नागरिक नरकयातना भोगत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. स्वच्छ भारत संकल्पना अमलात आणणारे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकडे साधे लक्षही देत नसल्याची खंत येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. या कॉलनीत काही दिवसांपूर्वी रस्ता खोदून पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली. तसेच भूमी अंतर्गत विद्युतपुरवठा लाइन टाकण्यात आली; मात्र खोदलेली जमीन पुन्हा योग्य प्रकारे बुजविण्यात न आल्याने सध्या रस्त्यावर चिखल पसरला आहे. वेळीच जर यावर डांबर टाकले असते, तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल पसरला नसता व रस्त्यात पावसाच्या पाण्याचे डोह साचले नसते. या साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रस्ता काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मुरूम आला एक खड्डा बुजविला भालेराव कॉलनीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून, काही ठिकाणी खड्डा पडला आहे, तर रस्त्यावर चिखल झाला असल्याचे येथील रहिवाशांनी पालिका अधिकारी यांच्याकडे व येथील लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुरमाचा ट्रक आला. रहिवाशांना वाटले, रस्त्यावरच्या पाण्यापासून व चिखलापासून आपली सुटका झाली. मात्र, त्या ट्रकवाल्याने एक खड्डा बुजविला व निघून गेला. त्यामुळे रस्त्याची आहे तीच परिस्थिती आहे. साथींच्या आजाराची भीती एकीकडे पालिका म्हणते, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा व दुसरीकडे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे हा कुठला न्याय, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. या कॉलनीत पावसाचे पाणी मागील काही दिवसांपासून साचले आहे. दुर्गंधी पसरली आहे, तरी पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी साधे फिरकले नसल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. पावसाळा सुरू असल्याने डेंगी, मलेरिया, साधा ताप यांसारख्या आजाराने नागरिक हैराण होतात, मग याचे काय असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
पावसामुळे रस्त्यांचे वाजले तीनतेरा
By admin | Published: July 03, 2017 3:03 AM