पिंपरी : महामेट्रोतर्फे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्याठिकाणी नाशिकफाटा येथे पोकलेन आणि रीग मशिन कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात साइट इंजिनिअरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनिअर साइट इंजिनिअर संजयकुमार सुशिलकुमार देव, साइट इंजिनिअर राहूलकुमार चंदुप्रसाद गोंड, रिग मशिन ऑपरेटर राजरतन जयप्रकाश पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलीस ठाण्यातील हवालदार संतोष महाडिक यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकफाटा येथे महामेट्रोकडून पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. हे काम करताना शनिवारी दुपारी १२० टन वजनी ड्रिलिंग क्रेन रस्त्यावर आडवी पडली होती. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. सुरक्षिततेची काळजी न घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, केवळ ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून उपयोग नाही. तर या प्रकरणी महामेट्रोच्या आणि महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरसुद्धा गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक पी. बी. गोफणे तपास करीत आहेत.