तळेगाव दाभाडे : सोमाटणे फाटा येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी तीन दरोडेखोरांना हत्यारासह पकडण्यात तळेगाव पोलिसांना यश आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन १७वर्षीय मुलाचा समावेश आहे. यामध्ये एका १७वर्षीय विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. त्याची बालन्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे. अटक केलेल्या दोघा दरोडेखोरांना वडगाव न्यायालयापुढे आज हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अभिजित हिरामण बोडके (वय २३) , समीर जालिंदर बोडके (वय २२ , दोघेही रा. गहुंजे, ता. मावळ) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्यावर देहूरोड व तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ओल्टर स्टिओ (वय २२, रा. साईनगर , देहूरोड) व त्याचा साथीदार सुभान (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) हे दोघे डोंगरावरून जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडेजवळील घोरावाडी डोंगराच्या पायथ्याला शंकरवाडी गावच्या हद्दीत घडला.निरीक्षक बाबर, सहायक निरीक्षक वायसिंग पाटील, गजानन जाधव, व्ही. व्ही. यामावर यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या दरोडेखोरांवर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
दरोड्याच्या तयारीतील तीन जणांना केले जेरबंद
By admin | Published: September 11, 2016 1:03 AM