- नारायण बडगुजर
पिंपरी : भंगाराची गाडी पकडून कायदेशीर कारवाई न करता पैसे घेऊन सोडून दिल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. तिघेही कर्मचारी हिंजवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी (दि. ४) रात्री उशिरा याबाबतचे आदेश दिले.
विलास बोऱ्हाडे, अशोक घुगे आणि ज्योतिराम झेंडे असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तिघांनी एका भंगारवाल्याची गाडी पकडली. त्यानंतर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असताना तसे न करता पैसे घेऊन गाडी सोडून दिली. महिनाभरापूर्वी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई न करता पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांना हिसका दाखवला.
बोऱ्हाडे, घुगे आणि झेंडे यांनी गंभीर स्वरुपाच्या गैरवर्तणूक प्रकरणी शिस्तभंग केला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.