पिंपरी : ओला आणि सुका घनकचरा विलगीकरण मोहिमेंतर्गत शहरातील १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या, ज्यांचे क्षेत्रफळ पाच हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा जास्त आहे, अशा मोठ्या संस्था अथवा गृहसंस्थांसाठी घनकचरा व्यवस्थापन उपभोक्ता शुल्क निश्चित केले आहे. शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया सर्व संस्थांकडून तीन रुपये प्रति दिन प्रति किलोनुसार उपभोक्ता शुल्क आकारण्यात येणार आहे. मोठ्या गृहसंस्थांसाठी प्रति सदनिकांकरिता दरमहा ९० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
राज्य सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत १ मे २०१७ पासून ओला, सुका आणि घरगुती घातक या पद्धतीने घनकचरा विलगीकरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने महापालिका आरोग्य विभागाने ३० डिसेंबर २०१७ रोजी ओला कचरा हिरव्या बकेटमध्ये आणि सुका कचरा निळ्या बकेटमध्ये विलगीकरण करण्याबाबत शहरातील सर्व गृहनिर्माण संस्था, हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालये, खानावळी, हॉस्टेल, उपहारगृहे, शाळा-महाविद्यालये, भाजीमंडई, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना सूचना केल्या होत्या. या संस्थांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये निर्माण होणाºया कचºयाचे विलगीकरण करणे, ओल्या कचºयावर निर्मितीच्याच ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारणे आणि सुका कचरा महापालिकेकडे देणे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत दिली.