पिंपरी : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी तीन दुचाकी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रविवारी (दि. २) हिंजवडी, भोसरी एमआयडीसी, आणि वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
अभिषेक अपूर्व कुमार कुंडू (वय २९, रा. ब्लूरिज सोसायटी, फेज १, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची एक लाख २० हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार १४ ऑगस्ट २०२१ ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत घडला.
प्रशांत मोहन पांढरपट्टे (वय ४६, थेरगाव) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी इंद्रायणीनगर येथे एका बॅंकेच्या समोरील पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. १) दुपारी पावणेदोन ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत घडला.
शशिकांत माधवराव मिरकले (वय ३१, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या मामाच्या मुलाच्या नावावर असलेली १५ हजार रुपये किमतीची दुचाकी फिर्यादीने थेरगाव येथे सार्वजनिक रस्त्यालगत पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी सव्वादोन ते तीन या कालावधीत घडला.