पिंपरी : जमीन मोजणीसाठी आलेल्या भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मोजणीसाठी विरोध केला. यावेळी तीन महिलांनी पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे मंगळवारी (दि. २) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
गणेश बाळासाहेब साबळे, नामदेव बबन साबळे, चांगदेव बबन साबळे, संदीप नामदेव साबळे, भरत भाऊसाहेब साबळे, बाळराजे चांगदेव साबळे, बापू चांगदेव साबळे, पेटवून घेणाऱ्या तीन महिला आणि अन्य एक महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी खेड/राजगुरूनगर भूमिअभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक धनंजय ठाणेकर यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाणेकर आणि त्यांचे सहकारी साबळेवाडी येथे शासकीय मोजणी करत होते. त्यावेळी तिथे संशयित आले. त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यास विरोध केला. आम्ही मोजणी करू देणार नाही. तुमचा काहीएक संबंध नाही. तुम्ही येथून निघून जा, असे ते म्हणाले. त्यामुळे फिर्यादी धनंजय ठाणेकर यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. एका मदतनीसाला धक्काबुक्की केली. जीपीएस मशीन ओढून घेतली. दगडाने ठेचून मारून टाकू तुम्हाला, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. जमीन मोजणीस विरोध करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तीन महिलांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल किंवा डिझेलसारखा दिसणारा ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.