पिंपरी : खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या टायगर ग्रुपच्या रायगड जिल्हाध्यक्षाला अटक करण्यात आली. पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी चिंचवड येथे त्याला पकडले.
नीलेश रमेश चव्हाण (वय २९, रा. सुकापूर ता. पनवेल, जि. रायगड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, नवी मुंबईमधील कामोठे पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी नीलेश चव्हाण हा चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटी समोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपीला कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक शाकीर जिनेडी, पोलीस कर्मचारी आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, अशोक दुधवणे, सुनील कानगुडे, निशांत काळे, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, किरण काटकर, सुधीर डोळस यांच्या पथकाने ही कामगिरी केली.