पिंपरी: घरगुती कारणावरून वाद घालणाऱ्या पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे घडला आहे. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला पोलिसांनीअटक केली आहे. पिंपळे गुरव येथे १ एप्रिल २०१७ ते २८ मे २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
श्रुती प्रतीक कांबळे (वय २४), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती प्रतिक माणिक कांबळे (वय ३०) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह विवाहितेची सासू मंगल, सासूची बहीण शांताबाई, विवाहितेची नणंद ज्योती व तिचा पती जगदीश (सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा अंबाजी गायकवाड (वय ५२, रा. कात्रज) यांनी या प्रकरणी शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक कांबळे हा श्रुतीला घरगुती कारणावरून वाद घालून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. प्रतीकचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे श्रुतीला कळाले होते. या कारणावरून प्रतिक नेहमीच तिच्याशी वाद घालून मारहाण करत असे. सासरच्या लोकांचीही कधीही दोघांच्या भांडणात मध्यस्थी झाली नाही. शेवटी श्रुतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत गायकवाड यांनी तक्रार केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी प्रतीक याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे पुढील तपास करत आहेत.