पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे शहरातील स्थायी समिती अध्यक्षपदावरून सुरू झालेले बंड शमले आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून स्थायीच्या सदस्यांना थेट पक्षादेश (व्हिप) काढला आहे. तसेच, हात वर करून मतदान केले जाणार असल्याने स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड यांची निवड निश्चित मानली जात आहे.महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक ७ मार्चला (बुधवारी) १२ वाजता होणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाकडून ममता गायकवाड तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्वर भोंडवे रिंगणात आहेत. राष्टÑवादी काँग्रेसचे भोंडवे यांनी अर्ज सादर केला असला तरी त्यांच्याकडे अवघी चार ते पाच मते आहेत. भाजपाकडे ११ मते आहेत. तर शिवसेनेकडे एक मत आहे. भाजपाचे पारडे जड असल्याने आणि फुटीरांना कारवाईची धास्ती असल्याने गायकवाड यांची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे या आमदार लक्ष्मण जगताप समर्थक होत्या़ या वेळी आमदार महेश लांडगे समर्थकास संधी मिळणार अशी चर्चा सुरू असताना, जगताप समर्थक असलेल्या ममता गायकवाड यांचे नाव ऐनवेळी पुढे आले. हे नाव पुढे येताच आमदार लांडगे समर्थकांनी राजीनामे देऊन नाराजी व्यक्त केली. या नाट्यमय घडोमोडीनंतर होणाºया निवडणुकीत गायकवाड यांची वर्णी कशी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याने आमदारांचे समर्थक नाराज झाले आहेत. महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिला आहे. तर, राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा पक्षाध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांचे ममता गायकवाड, सागर अंगोळकर, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे हे चार समर्थक सदस्य आहेत. तर आमदार महेश लांडगे यांचे राहुल जाधव, लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, नम्रता लोंढे हे चार समर्थक नगरसेवक स्थायी समितीत सदस्य आहेत.आमदारांच्या संगनमताची राजकीय खेळीआमदार लक्ष्मण जगताप समर्थक आणि आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेल्यांना आलटून पालटून विविध पदांवर संधी देण्याचे धोरण अवलंबले जात असताना, दुसºयांदा जगताप समर्थकांचेच नाव पुढे येते. अनपेक्षित नाव पुढे येताच, आमदार महेश लांडगे समर्थक राजीनामा देऊन नाराजी व्यक्त करतात. त्यांची नाराजीची आक्रमकता जाणवत नाही. समजूत काढण्यातही लगेच यश मिळते. हा घटनाक्रम लक्षात घेतला तर दोन्ही आमदारांकडून संगनमताची राजकीय खेळी खेळली जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘स्थायी’ची आज निवड : ममता गायकवाड अध्यक्षपदी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:31 AM