पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील राजीनामा दिलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा एकूण पाच जागांची निवड मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. यावर वर्णी लावण्यासाठी आमदार व खासदार समर्थकांमध्ये चुरस लागली आहे. जुन्या आणि नव्यांचा समन्वय साधला जाणार आहे.महापालिकेच्या स्थायी समितीत दर वर्षी सर्व नवीन सदस्यांना संधी देण्याचे धोरण सत्ताधारी भाजपाने अवलंबिले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाच सदस्यांचे राजीनामे घेतले होते. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य आहेत. यात भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्षांच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. समितीतील सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी असला, तरी सोळापैकी आठ सदस्य एक वषार्नंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्चित केली जातात. चिठ्ठीद्वारे भाजपाचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड मागील सभेत झाली होती.नवीन सदस्य निवडसत्ताधारी भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे लकी ड्रॉमधून वाचले होते. मात्र, सर्वच सदस्य नवीन देण्याचे धोरण भाजपाने अवलंबिल्याने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. हे सर्व राजीनामे महापौरांनी मंजूर केले आहेत. रिक्त झाल्या आहेत. त्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. समितीत संधी मिळावी यासाठी नगरसेवकांनी खासदार अमर साबळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष जगताप, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्याकडे साकडे घातले आहे. गटांच्या ताकदीनुसार नेत्यांशी आज चर्चा झाली. नावेही निश्चित झाली आहेत.अपक्षांचा स्वतंत्र गटभाजपासोबतच अपक्षांचा स्वतंत्र गट आहे. गटनेते कैलास बारणे, झामाबाई बारणे, नवनाथ जगताप, साधना मळेकर आणि नीता पाडाळे यांचा समावेश आहे. पहिल्या वर्षात बारणे यांना संधी दिली होती. अपक्षांकडून झामाबाई बारणे, जगताप, मळेकर की पाडाळे यापैकी कोणाला संधी दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे भाजपाच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे देतील. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून नियुक्ती झाल्याची घोषणा केली जाणार आहे.
स्थायीच्या पाच सदस्यांची आज निवड; खासदार, आमदार समर्थकांमध्ये होणार चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:51 AM