लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती देणारे ‘टॉयलेट लोकेटर’ हे अॅप विकसित करणार आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. अशा प्रकारचे अॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका एकमेव आहे, असेही त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह दर्शवणारे टॉयलेट लोकेटर अॅप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे. पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बस स्थानके आदी ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची व स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येते. पिंपरी पालिकेनेही त्याचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने आवश्यक पावले उचलण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालयांची संख्या अडीच ते तीन हजारांपर्यंत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. ही माहिती गुगल मॅपवर टाकण्यात येणार आहे. त्याअगोदर महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
पालिकेचे ‘टॉयलेट लोकेटर’ अॅप
By admin | Published: July 07, 2017 3:41 AM