पिंपरी : लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाहन खरेदीचा टॉप गिअर दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. ही संधी साधत सुटी असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘आरटीओ’कडून वाहन नोंदणीसाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात आले होते.
दसऱ्याच्या मुहूर्तावर साडेतीन हजार वाहनांची नोंद करण्यात आली असून २४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक, वाहन हस्तांतरण अशा विविध कारणांसाठी या आठवड्यात पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढली होती. गत वर्षीपेक्षा वाहन नोंद कमी झाली असली तरी ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू होताच वाहन विक्रीत वाढ होत आहे. ही दिलासादायक बाब असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
सण-उत्सवानिमित्त वाहन कंपन्यांकडून सवलत व विविध योजना जाहीर केल्या जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा योजना व सवलत मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या होत्या. त्याचा लाभ घेण्यासाठी व शुभमुहूर्तावर वाहन खरेदीची हौस पूर्ण करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू होती. तसेच वाहन नोंदणी विभाग आणि आकर्षक क्रमांक मिळावेत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू होते. दस-यानिमित्त शासकीय कार्यालये बंद असतात. त्यात यंदाचा दसरा रविवारी होता. असे असतानाही ग्राहकांना दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन मिळावे आणि दुसरीकडे आरटीओ कार्यालयातील महसूल वाढविण्यासाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी या आठवडयात पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान १९२३ दुचाकी तर, १४६० चारचाकी वाहनांची नोंद झाली. तसेच २४७ इतर अशी एकूण ३३६० वाहनांची नोंदणी झाली. या माध्यमातून २४ कोटी १३ लाख ४९ हजार १२८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर, दस-याच्या दिवशी अर्थात रविवारी एकूण १०७ वाहनांची नोंद झाली. यातून रविवारी एक कोटी ४२ हजार २७५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ----वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. सणउत्सवानिमित्त मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती दिली जाते. त्यासाठी सुटीच्या दिवशीही वाहन नोंदणी केली. आकर्षक क्रमांकाच्या नोंदणीतून चांगला महसूल प्राप्त झाला. - अतूल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
पिंपरी-चिंचवड १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यानची वाहन नोंदणी दुचाकी १९२३ चारचाकी १४६० इतर २४७ प्राप्त महसूल - २४ कोटी ४२ लाख