लोणावळा : उंटावरून रफेट मारल्यानंतर पैसे देण्याघेण्यावरून झालेल्या किरकोळ वादावादीनंतर लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे काही स्थानिक व्यावसायिकांकडून पर्यटकांना मारहाण झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या मारहाणीत पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी इबाद अब्दुलसत्तार मेमन (वय ५२, रा. फत्तेगंज वडोदरा, गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दहा ते बारा जणांच्या विरोधात मारहाण व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तानाजी शिवाजी राजिवडे (वय २०), चंद्रकांत यशवंत टाकवे (३१), विश्वास यशवंत टाकवे (४२), राजेश बद्री जाधव (२३, सर्व राहणार आतवण, ता. मावळ, जिल्हा पुणे)चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना १९ जानेवारी पर्यत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात येथील मेमन कुटुंबांतील २५ जण मकरसंक्रांतीच्या सुटीनिमित्त लोणावळ्यात फिरायला आले होते. सोमवारी सायंकाळी ते टायगर पॉइंट येथे फिरायला गेले असता लहान मुले घोड्यावर व उंटावर बसून रपेट मारत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली.
४उंटवाल्यासोबत पैसे देण्याघेण्यावरून पर्यटक असिम मोतीवाला याचा वाद सुरू होता. कोणीतरी असिम मोतीवाला याच्या डोक्यात काचेची बाटली मारली, या वेळी भांडण सोडविण्याकरिता मेमन कुटुंबातील महिला व पुरुष गेले असता त्याठिकाणी जमा झालेल्या दहा ते बारा स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटकांना काचेच्या बाटल्या, हाताने, काठीने व पाईपने बेदम मारहाण केली तसेच महिलांच्या गळ्यातील व हातातील मौल्यवान वस्तू ओढून घेतल्या. अहमद अब्दुल रज्जाक मेमन (वय २५), सुफियान अब्दुल रज्जाक मेमन (वय २९), रईसा अब्दुल रज्जाक मेमन, असिफा रफीक मोतीवाला व नसर इबाद मेमन (सर्वजण राहणार वडोदरा, गुजरात) हे पाच जण या मारहाणीत जखमी झाले.