कामशेत - येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहनांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. महामार्गालगतच्या रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामशेत हद्दीत वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली असून, यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. पुणे व उपनगरमधील पर्यटक लोणावळा, खंडाळा भागात वर्षाविहारासाठी जात असून, त्यांना परतीच्या वेळी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी दुपारी चारनंतर ते रविवारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीचे सत्र सुरू होते. याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे महामार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी स्थानिक नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली. यातूनच मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. सुरुवातीला अत्यंत संथ गतीने सुरू असलेले हे काम कामाची मुदत जवळ येताच वेगात सुरू झाले. मात्र स्थानिक नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. मुख्य महामार्गाची वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली. त्यामुळे येथे पूर्वीपेक्षा जास्त अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पवनानगरकडे जाणारा अंडर पास मार्ग अपूर्ण असताना तो महामार्ग ओलांडण्यासाठी खुला करण्यात आल्याने शिवाय वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी येथे वाहतूक पोलीस अथवा तत्सम उपाययोजना न झाल्याने महामार्गावरील कोंडीत भर पडली आहे.महामार्गाच्या सेवारस्त्याची रुंदी वाढवली नाही. पवनानगर फाटा हा वाहतुकीचा मुख्य फाटा असून येथे अनेक प्रवासी वाहने थांबतात. नोकरदार वर्ग वाहनांना हात करून येथून प्रवास करतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच महामार्गाच्या पलीकडे सेवारस्त्यावर गेली अनेक वर्षे मजूर अड्डा भरत असून येथे चार-पाचशे मजूर रोज उभे असतात. सकाळी सातपासून ते दहापर्यंत व सायंकाळी येथे मजुरांची मोठी गर्दी असते. त्यांना नेण्यासाठी व सोडण्यासाठी येणारे बांधकाम व इतर विभागाचे ठेकेदार रस्त्याच्या मध्येच वाहन लावतात. याच भागात दारूची दुकाने व चायनीज सेंटर असल्याने गर्दी असते. येथील मजूर अड्डा हलवून तो छत्रपती शिवाजीमहाराज चौकात करावा, अशी मागणी होत आहे.महामार्गावरून कामशेतमध्ये येणाºया मार्गाने अनेक पर्यटक वाहने आल्याने कामशेत शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते, तर याचा स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात कामशेत पोलीस ठाण्याच्या पुढे मुंबई-पुणे लेनवर एक चारचाकी वाहन अर्धे खड्ड्यात गेले होते. या वाहनात पती, पत्नीसह त्यांचा एक वर्षाचा मुलगा होता. रात्री उशिरापर्यंत वाहतूककोंडी कायम होती. मागील रविवारपेक्षा या रविवारी तिप्पट वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.मुदत संपूनही काम पूर्णत्वास नाहीया मार्गावर अनेक समस्या असल्याने या फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन व इतर संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही लेनवर दहा-दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पवनानगर फाटा येथे नागरिकांच्या सोर्ईसाठी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मात्र मुदत संपून दीड महिना झाला, तरी हे काम पूर्ण होत नाही. वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.वाहनांच्या १५ किमीपर्यंत रांगापावसाळ्याच्या दिवसांमध्ये वर्षाविहारासाठी पुणे व उपनगरचे व इतर भागातील पर्यटक लोणावळा, खंडाळा व मावळ परिसरात येत असतात. शनिवार, रविवारी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. या पर्यटकांच्या परतीच्या वेळी त्यांची वाहने कामशेतमधील वाहतूककोंडीत अडकतात. त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रविवारी (दि. ८) दुपारी चारपासून या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही बाजूंकडे सुमारे १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. या वाहतूककोंडीत लोणावळा, खंडाळा भागात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळेच भुशी डॅमचे पर्यटक कामशेतच्या वाहतूककोंडीत अडकले.
वाहतूककोंडीमध्ये हरविले पर्यटक, लोणावळा परिसरात गेलेल्या पर्यटकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 2:15 AM