कामशेत : येथील मुंबई-पुणे महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पर्यटकांना कामशेत परिसरातून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यावर अनेक किरकोळ अपघात झाले आहेत.मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथे गेल्या अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू असून, कामाची मुदत संपूनही हे काम पूर्ण झाले नाही. त्यातच पावसामुळे हे काम बंद आहे. उड्डाणपुलाच्या कामी महामार्ग बंद करून वाहतून सेवारस्त्याने वळवण्यात आली आहे. सेवारस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, सर्वच रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहेत. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.उड्डाणपुलासाठी नागरिकांना धरले वेठीसकामशेत भागातील महामार्गावरील आदी सर्व समस्यांमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक व महामार्गावरील वाहनचालक सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलाच्या कामी कामशेतकर नागरिक, पर्यटक व महामार्गावरील वाहनचालक यांना वेठीस धरले असल्याचा आरोप स्थानिकांकडून होऊ लागला आहे. उड्डाणपुलाच्या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना पक्षाच्या वतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले. या वेळी संबंधित ठेकेदार व एमएसआरडी अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना जोडे मारण्यात आले होते. तर येत्या काही दिवसांत कामशेत शहर विकास संघर्ष समिती यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
पर्यटकांची वाट अद्याप बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:22 AM