लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतर्फे ११ वर्षांपासून दर वर्षी राजर्षी शाहूमहाराज जयंती महोत्सवात ‘राजर्षी शाहू पुरस्कार दिला जात असे. हा पुरस्कार या वेळी दिला नाही. विविध स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव समारंभही न घेतल्याने कोल्हापूरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा मात्र कार्यक़्रमाच्या आयोजनात महापालिकेने आखडता हात घेतला. कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीची निवड करून पुरस्कार दिला जातो. मात्र, या पुरस्काराची परंपरा खंडित झाली आहे. तत्कालीन महापौर प्रकाश रेवाळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध संस्थांनी वेगवेळा जयंती सोहळा साजरा करण्यापेक्षा एकत्र येऊन महापालिकेतर्फे जयंती साजरी करण्याची संकल्पना मांडली होती. मंगला कदम यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत २००५ पासून कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती साजरी केली जात होती. २०१७ ला महापालिकेत सत्तांतर झाले. राष्ट्रवादीची सत्ता गेली, त्यांच्या जागी भाजपाची सत्ता आली आहे.दरम्यान, चिंचवड येथील राजर्षी शाहूमहाराजांच्या पुतळ््याला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) शहराध्यक्ष एम. पी. कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी गौतम जकाते, दयानंद वाघमारे, विक्रम कांबळे, राहुल म्हस्के, शाहू वाघमारे आदी उपस्थित होते.
शाहू पुरस्काराची परंपरा खंडित
By admin | Published: June 28, 2017 4:02 AM