पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (दि.११) आगमन होणार आहे. यादरम्यान वारकऱ्यांची मांदियाळी राहणार असल्याने शहरातील वाहतुक सुरळीत रहावी, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे १० जून रोजी देहू येथून आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे ११ जून रोजी आळंदी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दोन्ही पालखी सोहळ्यांचे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून प्रस्थान होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही चोख बंदोबस्तासह सुरळीत वाहतुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि.११) सायंकाळी पिंपरी- चिंचवड शहरात आगमन होणार आहे. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात रविवारी पालखीचा मुक्काम राहिल्यानंतर सोमवारी सकाळी पालखीचे पुण्यात मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे. एक दिवस पालखीचा शहरात मुक्काम राहणार असल्याने वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून, वाहनचालकांना पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार देहूगाव कमान ते परंडवाल चौक हा रोड ८ ते ११ जूनदरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी भक्तिशक्ती चौक, त्रिवेणीनगर, तळवडे गावठाण, कॅनबे चौक, खंडेवाल चौक, देहूगाव मार्गाचा वापर करावा.
सेंट्रल चौक देहू रोड ते भक्तिशक्ती चौक मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सेंट्रल चौक, मामुर्डी, किवळे, भुमकर चौक, डांगे चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
भक्तिशक्ती चौक ते पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी काचघर चौकाकडून बिजलीनगर चौकमार्गे डांगे चौकामार्गे पुण्याकडे जावे लागणार आहे.