पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. ४) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मतमोजणी होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बालेवाडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. तसेच या मतमोजणी केंद्र परिसरात वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत शनिवारी (दि. १) आदेश दिले. वाहतुकीतील हा बदल मंगळवारी (दि. ४) पहाटे ५.०० पासून रात्री ११.३० पर्यंत आवश्यकतेनुसार गर्दी संपेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहतुकीत केलेले बदल :
हिंजवडी, वाहतूक विभाग अंतर्गत
- मंगळवारी (दि. ४) पहाटे ५.०० ते रात्री ११.३० या वेळेमध्ये बालेवाडी स्टेडीयम मुख्य प्रवेशव्दारा समोरील रस्ता उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग : १) चांदे- नांदे व म्हाळुंगे गावातून येणारी वाहने ही उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकी येथून पुढे राधा चौकाकडे व इच्छितस्थळी जातील.
२) राधा चौकातून येणारी वाहने ही म्हाळुंगे पोलिस चौकी येथे डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, चांदे- नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील.
- मंगळवारी (दि. ४) पहाटे ५.०० ते रात्री ११.३० या वेळेत जड व अवजड वाहनांना म्हाळुंगे गाव ते राधा चौक आणि राधा चोक ते म्हाळुंगे गाव या मार्गावर प्रवेश बंद राहील.पर्यायी मार्ग : चांदे नांदे येथून येणारी जड अवजड वाहने ही गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण मार्गे हिंजवडी येथे येऊन इच्छित स्थळी जातील, व बाणेर रस्ता व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी जड अवजड वाहने ही राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व पुढे इच्छित स्थळी जातील.
...अशी आहे पार्किंग व्यवस्था
पाकिंग १ - म्हाळुंगे पोलिस चौकी ते उत्तम स्विट (पुणेरी स्वीट) चौक या मधला रस्ता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी राधा चौकातून पुढे डाव्या बाजुला खंडोबा मंदिराच्या पाठिमागील मोकळ्या जागेमध्ये पार्कींगकरीता व्यवस्था केली आहे.
पार्किंग २ - ऑर्किड हॉटेल महामार्ग प्रवेशव्दारापासून सुरू होणारा सेवारस्ता हा मुळा नदी ब्रिज पर्यंत रहदारीसाठी बंद ठेवला असून हा रस्ता महायुतीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी पार्किंगची व्यवस्था त्या सेवारस्त्यावर केली आहे.
पार्किंग ३ - इतर पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे.