पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यामुळे येथे या कंपन्यांतील आयटीएन्स आणि कामगारवर्ग मोठ्या संख्येने ये जा करतो.वाकड-भूमकर चौकातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी ही वाहने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येत असल्याने उद्योगनगरीतील रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याने आयटी अभियंते हैराण झाले आहेत. हिंजवडी, तळेगाव, चाकण व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सुमारे ३५ लाखांहून अधिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी परिसरात आयटी कंपन्यांसह मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. या क्षेत्रात लाखो कामगार काम करतात. हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या फेज १, २ व ३ क्षेत्रात शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. राज्य व देशभरातील २० लाख नागरिक या शहरात नोकरी व व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्या तुलनेत शहरातील वाहतूक व्यवस्था तोकडी आहे.
वाहतुकीबाबचे नियोजन करण्यात संबंधित यंत्रणा आणि प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वाकड येथील भूमकर चौकातून हिंजवडीकडे जाणाऱ्या चौपदरी भुयारी मार्गाचे मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आठ पदरी भुयारी मार्ग करून वाहतुकीची कोंडी सोडविण्याची मागणी आहे. भूमकर चौकात दररोज सकाळी साडेआठ ते अकरापर्यंत तसेच सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत..............भूमकर चौकाला पर्यायी मार्गाची आवश्यकता भूमकर चौकामध्ये डाव्या बाजूला सातारा, बेंगळुरुकडे जाणार अरुंद रस्ता आहे. तसेच उजव्या बाजूला ताथवडेकडे जाणारा रस्ता सुमारे १५ फुटी रस्तादेखील अरुंद आहे. त्याचप्रमाणे पुलाच्या बोगद्याच्या उजव्या बाजूला पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रीय महामार्गाला मुंबईकडे जाणारा अरुंद रस्ता आहे व डाव्या बाजूने बेंगळूरु-सातारा मार्गावरून पिंपरी-चिंचवड शहरात येणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होते. कात्रजमार्गे पिंपरी-चिंचवडमध्ये येणाºया वाहनचालकांनाही कोंडीचा सामना करावा लागतो. हिंजवडीकडून येणाºया वाहनचालकांनाही या समस्येला सामोरे जावे लागते. तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. त्यामुळे भूमकर चौकाला पर्यायी मार्गाची आवश्यकता आहे. .............अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका वाहतूककोंडी सोडविण्यासाठी दोन महिन्यांत संबंधित प्रशासनाने योग्य ती ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघातर्फे केली आहे. समस्या न सोडविल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, एन.डी. भोसले, निर्मला माने, मुकेश चुडासमा, संभाजी बारणे आदींनी मागणी केली आहे............भूमकर चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. केवळ तात्पुरती उपाययोजना होत असल्याने समस्या कायम आहे. विविध प्रयोग करुनही कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेचा फटका आयटीयन्स तसेच अन्य वाहनचालकांना बसत आहे. तसेच कोंडीमुळे शहरातील प्रदुषणात भर पडत आहे.