चिखली (पुणे) : निगडी, चिखली, भोसरी परिसरातील औद्योगिक वसाहतीमधून चाकण, देहू, महाळुंगेला जायचे म्हटले, की जवळचा मार्ग म्हणून शहरातील चाकरमानी व वाहतूकदारांकडून तळवडेमार्गे जाणाऱ्या रस्त्याला पसंती देतात. शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होणार असल्याने शहरातील संपूर्ण पोलिस यंत्रणेचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला व शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे त्रिवेणीनगर ते तळवडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची कमतरता होती. परिणामी, या वर्दळीच्या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
पिंपरी-चिंचवड व चाकण औद्योगिक वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता म्हणून तळवडेमार्गे जाणारा रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावर सकाळ, दुपार व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिक वैतागल्याचे चित्र पहावयास मिळाले. वाहतूक नियंत्रक विभागाचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने काही स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु वाहनांच्या रांगा लांब असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी दिसून आली.
वाहतूक विभागाच्या क॔ंत्राटी कर्मचाऱ्यांना (ट्रॅफिक वाॅर्डन) विचारणा केली असता वाहतूक विभागाचे कर्मचारी मुख्यमंत्री दौरा बंदोबस्तावर असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे, असे सांगण्यात आले.
ही आहेत वाहतूक कोंडी निर्माण होण्याची कारणे-
रस्त्याच्या दुतर्फा होत असलेली अवजड वाहनांची पार्किंग.
अंतर्गत रस्ते छोटे व वाहनांची संख्या जास्त असल्याने रस्ते अपुरे पडतात.
पदपथांची दुरवस्था असल्याने पादचारी मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करतात.
रस्त्यावर असलेले गतिरोधक अदृश्य असल्याने वाहनांचा वेग मंदावतो.
बेशिस्त वाहनचालकांकडून विरुद्ध दिशेने घुसखोरी केली जात असल्याने दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी होते.
चौकात असलेले वाहतूक नियंत्रक दिवे वारंवार बंद पडल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.